Sahyog Charity

प्रत्येक युगात काही व्यक्तिमत्वं अशी असतात जी इतिहासाच्या पानांवर अमर होतात. पण काहींचं भाग्य असं असतं की त्यांनी कितीही मोठं कार्य केलं, तरीही त्यांचं योग्य मूल्यमापन होत नाही. कर्ण हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण.

कर्ण – महाभारतामधील एक अत्यंत दु:खी पण अद्वितीय योद्धा, दानशूर आणि निष्ठावान मित्र. पण आजच्या युगात प्रश्न उपस्थित होतो — “कर्णासारखा दानवीर आज या पृथ्वीवर का नाही?”

जात, जन्म आणि दुर्भाग्य

कर्ण हा सूर्यपुत्र होता, पण त्याचा जन्म कुंतीने गुप्तपणे केला. समाजाने त्याला सूतपुत्र म्हणून हिणवलं. एक महान योद्धा असूनही, त्याला अनेक वेळा त्याच्या जातीमुळे नाकारण्यात आलं. आजही समाजात अनेक ‘कर्ण’ आहेत जे गुणवंत असूनही सामाजिक रचनेमुळे नाकारले जातात.

दानधर्माची पराकाष्ठा

कर्णाची दानशक्ती इतकी विलक्षण होती की त्याला “दानवीर कर्ण” म्हणण्यात आलं.
सर्वात मोठं उदाहरण म्हणजे – त्याला माहिती होतं की देवेंद्र त्याच्याकडे ब्राह्मणाचा वेष घेऊन त्याचं कवच-कुंडल मागणार आहे, जे त्याला आयुष्यातील सर्वात मोठं रक्षण करतं.
कवच-कुंडल दान दिल्यावर तो मरणास सन्मुख होईल, हे त्याला माहीत असतानाही, कर्णाने नकार दिला नाही – उलट आनंदाने त्याने ते दान केलं.अशी निःस्वार्थता आणि धैर्य मानवतेच्या इतिहासात दुर्मिळ आहे.

आजच्या युगात आपण फक्त दान केलं की सेल्फी घेतो, पोस्ट करतो, प्रसिद्धी शोधतो. पण कर्णाचं दान निःस्वार्थ होतं — त्यामध्ये प्रसिद्धी नव्हती, फक्त सेवा होती.

निष्ठा आणि मित्रधर्म

कर्णाने दुर्योधनाचा मित्र म्हणून शेवटपर्यंत निष्ठा ठेवली, जरी तो चुकीच्या बाजूला होता. आजच्या युगात स्वार्थासाठी मित्र बदलणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कर्णाने आपले सर्वस्व एका मित्रासाठी दिलं. ही निष्ठा शिकवण देऊन जाते की खरी मैत्री ही त्यागावर आधारित असते.

आज कर्ण कुठे आहे?

आज आपण समाजात बघतो, शिक्षण, राजकारण, व्यवसाय — सगळीकडे ‘मी काय मिळवू शकतो?’ या दृष्टिकोनाने वागणं वाढलं आहे. पण कर्णाने ‘मी काय देऊ शकतो?’ हे जीवनविचार म्हणून घेतलं. म्हणूनच कर्णासारखा दानशूर दुर्मिळ आहे — कारण त्याच्या सारखं निःस्वार्थी, नीतिमान आणि धैर्यशील मन आज फार कमी बघायला मिळतं.

सहयोग चॅरिटेबल ट्रस्ट – कर्णाच्या आदर्शावर चालणारी सेवा

आज जरी कर्ण या पृथ्वीवर नसला, तरी त्याचे आदर्श काही संस्था आणि व्यक्तींमध्ये जिवंत आहेत. आम्ही ‘सहयोग चॅरिटेबल ट्रस्ट’ या माध्यमातून समाजातील गरजूंना मदत करण्याचं कार्य करत आहोत. आमचं कार्य कर्णाच्या निःस्वार्थ दानधर्माच्या तत्वांवर आधारित आहे. अन्नदान, वस्त्रदान, शिक्षणसाहाय्य, आरोग्यसेवा — या सर्व माध्यमातून आम्ही समाजात सकारात्मक परिवर्तन घडवत आहोत.

कर्णासारख्या विचारांना आधुनिक काळात साकारणं हीच आमच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे.

शेवटी…

कर्ण हा एक योद्धा नव्हता फक्त, तो एक विचार होता. एक अशी भावना होती जी ‘स्वतःपेक्षा इतरांसाठी जगण्याचं’ शिकवते.
आजही जर कोणी आपलं ज्ञान, वेळ, संपत्ती इतरांसाठी वापरत असेल — तर त्यात कर्ण जिवंत आहे.

पण तरीही, कर्णासारखा दानशूर या भू तलावर का झाला नाही?
कारण असे व्यक्तिमत्त्व पुन्हा कधी होणार नाही.
कर्णाच्या निःस्वार्थतेला, त्यागाला आणि निष्ठेला तोड नाही — आणि त्याचमुळे तो केवळ महाभारतात नव्हे, तर मानवतेच्या इतिहासात अजरामर आहे.

प्रिन्स बर्वे
कर्णाच्या विचारांनी प्रेरित समाजसेवक